स्वाती भट, कॉलेज क्लब रिपोर्टर
तरुणाईचा श्वास बनलेलं इंटरनेट, सोशल मीडियाचा अभ्यासातही वापर करून घेण्याचा, अगदी क्रांतीकारी म्हणता येईल असा निर्णय एसएनडीटी विद्यापीठानं घेतला आहे. येत्या शैक्षणिक वर्षांत टेक्नॉलॉजीच्या मदतीनं शिकण्याचा अनुभव देणारे अनेक अभ्यासक्रम विद्यापीठातर्फे आणले जाणार आहेत.
वायफाय सुविधा, कम्प्युटर लॅब या आधुनिक सुविधा अनेक कॉलेजांमध्ये असतात. तरीही एखाद्या प्रोजेक्टपुरता किंवा अभ्यासात सोशल मीडियाचा ठराविकच वापर केला जातो. पण त्या पलीकडे जात एसएनडीटी विद्यापीठ पुढचं पाऊल टाकत असून, विद्यार्थिनींना ‘नेट’का अभ्यास करण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी टेक्नॉलॉजी बेस्ड अभ्यासक्रम तयार करण्यात येत असून, येत्या शैक्षणिक वर्षात प्रायोगिक स्तरावर हा उपक्रम राबवला जाणार आहे. त्यासाठी कॅम्पसमध्ये खास सर्व्हेसुद्धा करण्यात आला होता.
आपल्याकडच्या विविध अभ्यासक्रमांना तंत्रज्ञानाची जोड देण्याचं एसएनडीटीनं ठरवलं आहे. या अंतर्गत प्रोफेसर्स त्यांच्या विषयाशी संबंधित शैक्षणिक साहित्य, नोट्स, लेक्चर्स या गोष्टी तंत्रज्ञानाच्या वापरातून विद्यार्थिनींशी शेअर करतील. ‘मूडल’ या लर्निंग मॅनॅजमेन्ट सिस्टिमच्या सहाय्याने हे बदल करण्यात येत आहेत. विद्यापीठाचा एज्युकेशनल टेक्नॉलॉजी विभाग व कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग ही संस्था यांच्यात नुकताच याबाबत प्रशिक्षणासाठी करार करण्यात आला आहे.
अभ्यासाचं शेअरिंग
‘पॅडलेट’ या प्लॅटफॉर्मद्वारे विद्यार्थिनींना एकत्रित अभ्यास करण्याची सोय एसएनडीटीच्या एज्युकेशनल टेक्नॉलॉजी विभागातर्फे करून देण्यात येईल. यामध्ये प्रत्येक क्लासरुमचा ग्रुप बनवण्यात येतो. प्रत्येक विद्यार्थिनी त्यांना दिलेल्या विषयाच्या नोट्स काढून किंवा माहिती मिळवून यावर अपलोड करते. या नोट्स ग्रुपमधील इतर सदस्यही वाचू शकतील.
सर्व्हेमधल्या ठळक नोंदी :
या नवीन अभ्यासक्रमाच्या पद्धतीविषयी विद्यार्थिनींच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी विद्यापीठाच्या चर्चगेट, जुहू व पुणे कॅम्पसमध्ये नुकताच एक सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेमध्ये ऑडिओ-व्हिडीओ, सोशल नेटवर्क, डॅशबोर्ड, वेब-बेस्ड मटेरियल डेटाबेसेस अशा ई-रिसोर्सच्या अभ्यासक्रमातल्या समावेशासाठी विद्यार्थिनींनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
० ४५% विद्यार्थिनींनी आपल्याकडे संगणक असल्याचं, ५०% विद्यार्थिनींनी आपल्याकडे लॅपटॉप असल्याचं, तर ८०% विद्यार्थिनींनी आपल्याकडे स्मार्टफोन असल्याचं सांगितलं.
० ८८% विद्यार्थिनी घरच्या इंटरनेटचा, २३% विद्यार्थिनी सायबर कॅफेचा वापर करतात.
० ७८% विद्यार्थिनी रोज इंटरनेट वापरतात. केवळ ३% विद्यार्थिनींनी इंटरनेटचा वापर करत नाही असं सांगितलं. केवळ ४.५% विद्यार्थिनी इंटरनेटचा क्वचितच वापर करतात.
० ६८% विद्यार्थिनी एक तासापेक्षा अधिक काळ इंटरनेटवर असतात. ५०% विद्यार्थिनींना इमेल, वर्ड-प्रोसेसिंग, सर्च इंजिन चांगल्या प्रकारे वापरता येतं. केवळ १०% विद्यार्थिनी इमेल वापरता येत नाही असं म्हणाल्या.
० ८२% विद्यार्थिनी सोशल मीडियाचा वापर करतात. ८१% विद्यार्थिनींचं फेसबुक अकाउंट आहे. ८७% व्हॉट्सअॅप तर १८% हाईक वापरतात.
भविष्यात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून विद्यापीठाचे अभ्यासक्रम काळाशी सुसंगत बनवण्याचा आमचा मानस आहे. यामुळे विद्यार्थिनींचं रोजगार कौशल्य वाढण्यास मदत होईल.
डॉ. जयश्री शिंदे, विभागप्रमुख, एज्युकेशनल टेक्नॉलॉजी विभाग
From : http://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/college-club/sndt-university-mumbai/articleshow/58360148.cms